उपनिषदे
ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, माण्डुक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छान्दोग्य, बृहदारण्यक ही दहा उपनिषदे प्रमुख आहेत.
वेदांचे संहिता, ब्राह्मण आरण्यक आणि उपनिषद् असे चार भाग आहेत. मिमांसकांनी ‘मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम’ अशी एकदेशी व्याख्या केल्यामुळे फक्त संहिता आणि ब्राह्मण या ग्रंथांचा विचार तेवढा धर्ममीमांसेत करण्यात आला. त्यांनी ‘क्रिया सांगणारी वेदवाक्ये’ तेवढीच प्रमाण ठरवल्यामुळे ‘अहं ब्रह्मास्मि’, ‘तत्त्वमसि’, ‘प्रज्ञानं ब्रह्म’, ‘ॐ तत्सत् ब्रह्म’ इत्यादि वाक्यें अप्रमाण ठरली. त्यामुळे तत्त्वज्ञान सांगणारी उपनिषदें अगदी अडगळीत पडली. तेथून बाहेर काढण्याचे काम श्रीमद् आद्य शंकराचार्यांनीं त्यावर भाष्यें लिहून त्यांतील वेदान्त किती श्रेष्ठ प्रतीचा आहे – ते जगाच्या निदर्शनाला आणून दिले. उपनिषद्वाक्यांना विषय करून श्रीबादरायणाचार्यांनीं ब्रह्मसूत्रे लिहिली. त्यावरहि आचार्यांनी भाष्य लिहून उपनिषदांतील तत्त्वज्ञान-ब्रह्मज्ञान- आत्मज्ञान कसें भव्य व दिव्य आहे आणि प्रत्येक जीवाला दुःखनिवृत्तिपूर्वक परमानंदप्राप्ति करून देणारे आहे. त्याचे सविस्तर विवेचन करणे आवश्यक ठरते. उप + नि + षद् याचा अर्थ ब्रह्मविद्या किंवा रहस्यविद्या असा होतो हे काठकोषनिषद्भाष्याच्या उपोद्घातात आचार्यांनीं उत्तम रीतीनें दाखविले आहे.
भाष्य- ‘सदेर्धातोर्विशरणगत्यवसादनार्थस्य उपनिपूर्वस्य किप्प्रत्ययान्तस्य रूपमुपनिषदिति।’
‘सद्’ धातूचा अर्थ विशरण-नाश करणें, गति व अवसादन – शिथिल करणें असा आहे. ‘उपनिषद्’ असें नाम झाले.
तीन अर्थ असे
(१) ऐहिक व पारलौकिक विषयांविषयीं अतिशय विरक्त झालेले मुमुक्षु ज्या विद्येपाशी जाऊन निश्चयाने- आचार्यांच्या उपदेशानें अविद्यादि संसारबीजांचा नाश करितात ती विद्या.
(२) जी मुमुक्षूना परब्रह्माप्रत पोचविते ती विद्या.
(३) अग्निविद्या स्वर्गप्राप्तीचें निमित्त होत असल्यामुळें लोकान्तरी पुनः पुनः प्रवृत्त होणाऱ्या गर्भवास जन्म-जरा-मृत्यु इत्यादि
उपद्रवसमुहांस शिथिल करणें-ह्या अर्थाने सांगितली जाणारी विद्या. तसेंच तैतिरीयोपनिषद्भाष्याच्या आरंभी “उपनिषदिति विद्योच्यते । तच्छीलिनां गर्भजन्मजरादिनिशतनात् तदवसानाद्वा ब्रह्मणो वोपनिगमयितृत्वादुपनिषण्णं वाऽस्यां परं श्रेयः।” – उपनिषद् म्हणजे विद्या. ती आपल्या परिशीलन करणाऱ्या पुरुषाच्या- गर्भ, जन्म, जरा इत्यादिकांस शिथिल करीत असल्यामुळें किंवा त्यांचा नाश करीत असल्यामुळें अथवा ब्रह्मापाशी नेऊन पोचवीत असल्यामुळे तिला उपनिषद् असें म्हणतात.
उपनिषदें ही श्रुति होय; म्हणून त्यावरील भाष्य हे श्रुतिप्रस्थान. वेदान्तसूत्रे व त्यावरील भाष्य हे न्यायप्रस्थान. श्रीगीता व त्यावरील भाष्य हे स्मृतिप्रस्थान. उपनिषदांत सांगितलेलें जीवब्रह्मैक्य व अद्वैतान्तर्गत सर्व सिद्धान्त यांचे पूर्वोत्तर – पक्षपद्धतीने वेदान्त सूत्रांत केलेले प्रतिपादन ह्या दोघांच्या सिद्धान्तावर भर देऊन श्रीव्यासांनीं लिहिलेला श्रीगीता ग्रंथ. ह्या स र्वांत एकाच प्रकारचे ज्ञान कथन केलेलें असल्यामुळें त्यांना ‘प्रस्थानत्रय’ असें म्हणतात. उपनिषदे ही सर्व तत्त्वज्ञानाचे मूळ आहे. सर्व आस्तिक-नास्तिक दर्शनेंहि त्यांच्याच आश्रयाने प्रवृत्त झालेली आहेत. उपनिषदे ही वेदांचा अंत्य भाग असल्यामुळे त्यांना ‘वेदान्त’ असें म्हणतात.


