श्रीदत्त दर्शन

श्रीदत्तगुरु समजून घेण्यासाठी मूर्ती, चरित्र आणि तत्वज्ञान याविषयी बोलले पाहिजे. दत्तमहात्म्य, दत्त संवाद, श्रीदत्तात्रेय विषयक उपनिषदे याविषयी बोलणारे खूप कमी साधक आहेत. दत्त सांप्रदायिक म्हणून हि आपली जबाबदारी आहे कि दत्तगुरूंनी जे तत्वज्ञान सांगितलं त्याचा अभ्यासपूर्वक प्रचार प्रसार करावा. तळागाळापर्यंत दत्तगुरू पोहोचवावे समजून घ्यावे आणि समजून सांगावेसुद्धा. परमात्मा तसा अगम्य वाटला तरी त्याने म्हणजे ईश्वराने त्याच्याजवळ येऊन त्याचे बनून राहण्यासाठी तीन मार्ग निर्माण केले. श्रीदत्त भगवंत हा या तीनपैकी कोणत्याही मार्गाने प्राप्य आहे. नम्रता, सदाचार व प्रेमाचा शरणागती ठेऊन ज्ञान, कर्म, भक्ती यापैकी एखादा मार्ग निवडला तर जीवन कसे सफल होते व जे अलभ्य, अशक्य, असंभवनीय तेही कसे श्रीदत्त कृपेने सफल होते हे श्रीदत्तमाहात्म्यात दाखवले आहे.

परमार्थाचा मार्ग हा तसा मूळ अवघड आहे. ‘ब्रह्मज्ञान नोव्हे लेकुराच्या गोष्टी’, ‘देव नाही मंडईचा भाजीपाला रे।’ हे जरी सत्य असले तरी संतकृपेने तो कळण्यासाठी आपल्याला दत्त चरित्राचा अभ्यास करावा लागतो.

श्रीदत्तदेवच तसा आपल्यातला. एरवी श्रीविष्णू, लक्ष्मी, शंकर इ. देव हे राहतात स्वर्गात, त्यांचे पेय अमृत, जरी पृथ्वीवर आले तरी हिमालयादि पर्वतावर वा सागरात कोठे तरी त्यांचे वास्तव्य, त्यांचे जाणे येणे पुष्पकासारखा विमानाने, त्यांचे कपडे वगैरे तेही असेच स्वर्गीय, त्यांची म्हणून जी मंदिरे तीही स्वच्छ, पवित्र, त्यांना चंदनादि वस्तूंचे उपचार त्यात! म्हणजे श्रेष्ठ शक्ती, सामर्थ्य, वैभव व अमरत्व असणारे ते देव अशी आपली कल्पना असते. ही कल्पना चुकीची नाही पण परमात्म्यस्वरूप झालेल्या देवतांना असे रूप, स्थान, आकार वगैरे काहीच नसते.

श्रीदत्तभगवान हे एकमुखी, त्रिमुखी, सहा हातवाले किंवा दोनच हातवाले, कधी योगी तर कधी भोगी, कधी नगरवासी तर कधी स्मशानवासी असे आहेत. म्हटले तर ती देवता आहे म्हटले तर परमात्मा आहेत. बालोन्मत्त पिशाच्चवत असे त्यांचे रूपही आहे. तर माला कमंडलू, त्रिशूल, डमरू, शंख व सुदर्शन चक्र धारण करणारे असे ते आहेत. ते सर्वत्र आहेत आणि कोठेही नाहीत. श्रीदत्त यांची तुलना केलीच तर भगवान श्रीकृष्ण यांच्याशी होईल. इष्टानिष्ट, धर्मकर्म त्यांच्या कृपेने समजते, करता येते पण ते स्वतः सगळ्याच्या पलिकडचे असे आहेत. स्वतः देवच असा धर्माधर्माविवर्जित तर माणसांची काय कथा? पण अशा पापी पण भोळ्या भक्तांसाठी देव दत्त आहेत.

आपण दत्तांना समजून घेण आवश्यक आहे, दर्शन घ्यायचं तर दत्त मूर्ती, चरित्र आणि तत्वज्ञान या तिन्ही गोष्टीचा विचार केला तरच खर्या अर्थान आपण दत्तप्रभूंना नमस्कार केला अस होईल.

आपल्या व्याख्यानमालेतून आपण रोजच्या जीवनात दत्तगुरूंची शिकवण कशी उतरवू शकतो तेच पाहायचं आहे.