श्रीराम कथा

संपूर्ण सामाजिक जीवन उजळून टाकण्याकरिता ज्या दिव्य गाथेची, ज्या दिव्य कथेची, ज्या दिव्य आदर्शाची आज आवश्यकता आहे, ती रामकथा आहे. याविषयी आपण जेवढा जास्त प्रचार प्रसार करणे शक्य आहे तेवढा केला पाहिजे.

रामकथा ही जगातली सर्वोत्कृष्ट कथा आहे. या जगात अनेक कथा आहेत. आपणही नित्य कित्येक कथा ऐकतो. लोकांच्या कर्मकथा, वाङ्‌मयातील कथा, दूरदर्शनवर दिसणाऱ्या कथा, पुराणातल्या अथवा इतिहासातल्या कथा, वेदांमधील कथा अशा अनेक कथा आहेत.आनंदकंद भगवान श्रीरामचंद्रांच्या पावन कथा करीत असताना मन आनंदाने भरून येते.

समर्थ रामदास स्वामी म्हणतात – ‘कथा मोरयाची । कथा कार्तिकाची। कथा शंकराची। कथा भास्कराची । समस्तामधे श्रेष्ठ या राघवाची ।।’

रघुनंदनाच्या कथेइतकी सुंदर कथा, एवढी दिव्य कथा या जगात खरोखर अन्य नाही. रात्रंदिवस मनुष्याला ज्या एका रूपाचा, ज्या एका नामाचा ध्यास घेऊन जीवन जगावेसे वाटते, तसेच ज्या एका चरित्राने संपूर्ण जीवन कृतार्थ व्हावे असे वाटते, ते सारे या एका रामकथेमध्ये मिळते. आपलं व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन आणि संपूर्ण सामाजिक जीवन उजळून टाकण्याकरिता ज्या दिव्य गाथेची, ज्या दिव्य कथेची, ज्या दिव्य आदर्शाची आज आवश्यकता आहे, ती रामकथा आहे. आपल्या समाजात, आपल्या देशात विशेषतः युवकांच्या पुढे वारंवार मांडली जावी अशी एकमात्र रामकथा आहे. वारंवार तीच कथा मांडली गेली म्हणजे युवकांना त्याचे आकलन होईल. वाल्मीकींच्या रामकथेचे एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या रामकथेत बालरामाचे वर्णनच नाही. श्रीमद् भागवताच्या अनुकरणाने अनेक संतांनी बाल रामचंद्रांच्या लीलांचे वर्णन केले आहे. परंतु महर्षि वाल्मीकि रामकथेचा खरा आरंभ करतात तेव्हा श्रीरामांनी सोळाव्या वर्षात प्रवेश केलेला असतो. श्रीराम युवकांचे आदर्श असावेत. त्यांच्या बाललीलांचे वर्णन हे साधकांच्याकरिता अथवा भक्तांच्याकरिता कितीही उपयोगी असले, तरी युवकांच्याकरिता आदर्श म्हणून जेव्हा एक दिव्य व्यक्तिमत्त्व समोर ठेवायचे असेल तेव्हा तसे व्यक्तिमत्त्व युवा रामचंद्रांचे आहे. म्हणून वाल्मीकि-रामकथेचा खराखुरा आरंभ होतो तो युवक रामचंद्रांच्यापासून होतो.

माझ्या वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, माझ्या संस्थात्मक जीवनात अथवा सामाजिक जीवनात मी केव्हा केव्हा कसा कसा निर्णय घ्यावा; कुठला निर्णय योग्य आणि कुठला निर्णय अयोग्य, याबद्दल आपल्या धर्माचे मत काय आहे, याचे मार्गदर्शन रामकथेत आहे. महर्षि वसिष्ठांनी रामकथेमध्ये रामचंद्रांबद्दल म्हटले आहे – ‘रामो विग्रहवान् धर्मः’ नाना धर्मग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. सगळे वेद, सगळी पुराणं, सगळी शास्त्रं, नाना कथा बघण्याची सुतराम आवश्यकता नाही. एकच उपाय आहे- ‘रामादिवत् वर्तितव्यम् ।’ रामचंद्र म्हणजे घनीभूत धर्म. All highest human values personified. मानवी जीवनातल्या सगळ्या उत्तुंग गुणांचं साक्षात् साकार दर्शन म्हणजे भगवान श्रीराम आहेत. आपणा सर्वांना ठाऊक आहे की, धर्म हा आपल्या देशाचा प्राण आहे. पण धर्म म्हणजे काय? धर्माचे स्वरूप निश्चित करणे ही एक फार मोठी पंचाईत आहे. कारण वेदादिशास्त्रांच्यापासून तो आत्ता होऊन गेलेल्या संतांच्या वचनांपर्यंत अनेकांनी धर्माचा ऊहापोह केला. हा ऊहापोह इतका अधिक झाला की, भगवंतालाही शेवटी भगवद्‌गीतेत अर्जुनाला सांगावे लागले – “किम् कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः” काय करावे आणि काय करू नये हे कळणं फार दुरापास्त आहे. कोणत्या आचरणाला धार्मिक म्हणावे आणि कोणत्या आचरणाला धार्मिक म्हणू नये याचा लगेच निर्णय अत्यंत श्रेष्ठ ऋषीश्वर किंवा उत्तम विद्वानसुद्धा करू शकत नाहीत. त्यांची बुद्धीसुद्धा काही काळ मोहित होऊन राहते. धर्म इतका सूक्ष्म आहे. धर्म आपला प्राण आहे, पण धर्म कळणं ही तितकीच अवघड गोष्टही आहे.

पण ही गोष्ट सोपी व्हायची असेल तर त्याकरता फार गोड उपाय आहे. रामकथेचे श्रवण करा. भगवान श्रीरामचंद्रांचे जीवन समजून घ्या. रामांचे जीवन लक्षात आले की धर्म आपोआप लक्षात येईल. शेवटी धर्म धर्म म्हणजे तरी काय?  रामचंद्रांच्यासारखे जीवन बनविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे धर्म होय. एखादा मनुष्य कसाही असो, कुठल्याही समाजाचा असो, कुठलीही भाषा बोलणारा असो, कुठल्याही देशाचा नागरिक असो, नव्हे नव्हे, कुठल्याही जातीधर्माचा असो, प्रत्येकाला निःशंक अंतःकरणाने आपल्यासमोर ठेवता यावे असे या जगातले आदर्शतम चरित्र म्हणजे प्रभू रामचंद्रांचे चरित्र आहे.

यच्चयावत् मानवमात्राच्या कल्याणाकरता भगवान श्रीकृष्णांचे गोड-गोड लीलामृत आपण सर्वांनी पुष्कळ वेळेला प्राशन केलेले आहे. भगवान श्रीकृष्णांचे जीवन लोकोत्तर आहे. भगवान श्रीकृष्णांच्या लीला अति विलक्षण आहेत आणि त्या परमहंस महात्म्यांच्याही चिंतनाच्या दिव्य कथा आहेत. भगवान श्रीकृष्णांची कथा निःसंशय गोड, रसाळ, जीवाला तृप्त करणारी आणि अत्यंत आदरणीय पूज्य कथा आहे, पण भगवान श्रीकृष्णांची संपूर्ण कथा ही अनुकरणीय कथा आहे असे कुणीच म्हटलेले नाही. आस्वादनाकरिता, चित्ताच्या तृप्तीकरिता, साक्षात भगवंताच्या प्राप्तीकरिता त्या कथांचा मोठा उपयोग आहे. पण जीवनात कसं वागावं याकरिता आदर्श म्हणून प्रभू रामचंद्रांच्या दिव्य कथेचा उपयोग होतो. कृष्णकथा ही आस्वाद्य कथा आहे, तर रामकथा ही अनुकरणीय कथा आहे.