श्रीसत्यनारायण व्रत कथा
आपल्या संस्कृतीमध्ये सत्यनारायण पूजेचे अपार महत्व आहे हे आपण जाणता या प्रतांप्रमाणेच सत्यविनायक, सत्यदत्त, सत्यसूर्य, सत्यअंबा अशी अनेक व्रते करण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिसते.
श्री सत्यनारायण व्रत समजून घेताना; आधी हा शब्द समजून घेतला पाहिजे शब्दाचा अर्थ समजला की संकल्पना स्पष्ट होते. सत्य म्हणजे जे त्रिकालातीत आहे, सत्य म्हणजेच परब्रम्ह परमात्मा परमेश्वर एक आणि एकमेव ईश्वर.
नारायण म्हणजे विष्णू ज्याच्यापासून सर्वसृष्टी उत्पन्न झाली. व्रत हा शब्द आपण अनेक अर्थाने वापरतो. सण उत्सव व्रत – वैकल्ये अशा अर्थानी एक आणि दुसरा अर्थ सामाजिक कार्याचे व्रत अशा अर्थाने म्हणजे सातत्यपूर्ण केलेलं काम याला आपण व्रत असं संबोधतो. एखाद्या सामाजिक किंवा राष्ट्रीय कार्याचं आयुष्यभर व्रत घेतलेले अनेक महान व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. विविध धार्मिक व्रतांच उद्यापन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. नेमक कसं करायचं हे व्रताचे उद्यापन? यामागे सुद्धा मोठ तत्त्वज्ञान आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं आहे. व्रताच्या उद्यापनावेळी आपण ज्यांना बोलवतो; उदाहरणार्थ सुवासिनी, मेहूण, जोडपे उपासकरी यांना त्या व्रताची माहिती देऊन ते व्रत करण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे, म्हणजे एका कडून दुसऱ्याकडे हे व्रत हस्तांतरित झाले पाहिजे. आपण कहाण्या वाचतो; त्यामध्ये उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको ही ओळ यासाठीच आलेली आहे नाहीतर ही ओळ इथे लिहिण्याचं प्रयोजन झालंच नसतं. उदाहरणार्थ अनेक माता भगिनी वैभवलक्ष्मी व्रत करतात त्या उद्यापणावेळी व्रताची पुस्तक वाटण्याची परंपरा याच महान अशा विचारातून आली आहे.
श्रीसत्यनारायण पूजा म्हणजे नक्की काय ? कोणाची पूजा करतात ? असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे आणि ते विचारले सुद्धा पाहिजेत. आपल्या देव्हाऱ्यामध्ये असणारा गोपाळकृष्ण बाळकृष्ण याची पूजा केली जाते. जसं आपल्या कुटुंब संस्थेमध्ये परिवाराला फार महत्त्व आहे त्याचप्रमाणे देवांच्या पूजनाच्या वेळी परिवार देवतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे सत्यनारायणाच्या पूजेवेळी चौरंगावरील तांब्यावर ताम्हनात 21 देवता सुपारी रूपामध्ये मांडल्या जातात आणि त्यांचे पूजन केले जाते हा सत्यनारायण देवतेचा परिवार आहे. यामध्ये
९ नवग्रह – सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू.
८ अष्टलोकपाल – इंद्र, अग्नी, यम, निऋति, वरूण, वायू, सोम, ईशान.
याचबरोबर गणपती, दुर्गा, क्षेत्रपाल आणि वास्तोष्पति अशा एकूण 21 परिवार देवतांचे पूजन केलं जातं.
या परिवार देवतांचा विचार कर केला तर आपल्याला जाणीव झाली पाहिजे, की आपण निसर्गाच्या प्रत्येक तत्त्वाचीच पूजा करतोय. जल, भूमी, वायू, आकाश, अग्नी या पंचमहाभूतांविषयी मनामध्ये दररोज पूज्यभाव असला तर आपण यांचा अपमान म्हणजेच प्रदूषण कधीही करणार नाही. फक्त पूजेच्या दिवशी आदर व्यक्त करून चालणार नाही तर रोजच्या वागण्यामध्ये बदल दिसले तरच या देवता आपल्यावर कृपा करतील.
यानंतर आपण कृष्णाची पूजा करतो. ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांच्या कल्याणासाठी खर्च केलं. राष्ट्राच्या संरक्षणासाठी जे आवश्यक ते सगळं केलं. धर्माच्या बाजूने उभा राहिला, शत्रूंसाठी छळ कपट, कुटनीती, राजकारण सगळं वापरलं आणि भक्तांसाठी – धर्माने वागणाऱ्यांसाठी दयाळू कनवाळू झाला, प्रत्येकावर कृपा केली. सर्वांना एकत्र करून गोवर्धन पर्वत उचलला. अशा श्रीकृष्णाची आपण पूजा करतो जो राष्ट्रसंरक्षक आहे. गोवर्धनलीलेचा विचार केला तर समाजातल्या प्रत्येक घटकाला एकत्र करून सामाजिक एकता साधून एकोप्याने सर्वांच्या साथीने अवघड कार्य सोपं केलं. अशा श्रीकृष्णाची आपण पूजा करतो.
आपण कथा ऐकल्या पाहिजेत अध्यात्मिक श्रवणाला वेदांच्या श्रवणाला आपल्याकडे फार मोठे महत्त्व सांगितलं आहे. पिढ्यानपिढ्या इतकी वर्ष आपण या कथा ऐकल्या, म्हणून आज पर्यंत त्या टिकून राहिल्या. या कथांमुळेच संस्कृती आणि आपले संस्कार टिकून राहिले आहेत.
कलावतीची सुरस कथा आपण अनेक वर्ष ऐकतो वाचतो. त्याची गाणी सुद्धा प्रसिद्ध आहेत; ही पुराणकथा ऐकून फार पुण्य मिळतं असा उल्लेख आपल्याला पुराणांमध्ये आढळतो. पठण आणि श्रवण केल्याने पापक्षालन होतं, मोक्ष मिळतो असं शास्त्र पुराने सांगतात. आपणही थोडं समजून घेऊया की आजच्या 21 व्या शतकामध्ये या कथेची प्रासंगिकता काय आहे ? आपण या कथेतून कोणता विचार घ्यायचा ? ॲक्शन प्लॅन काय असला पाहिजे ?
कथेच्या पहिल्या अध्यायामध्ये पृथ्वीवरच्या दुःखी कष्टी व्यक्तींना पाहून देवर्षी नारद मुनींना कळवळा आला. त्यांनी ही परिस्थिती विष्णूंना सांगितली आणि विष्णूंनी सत्यनारायण व्रत कथन केलं. हे व्रत करून अनेकांना त्याचा फायदा झाला. याचप्रमाणे आपणही समाजातील दुःखी कष्टी रंजल्या गांजल्या लोकांशी संपर्क ठेवून त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सर्वांमध्ये भगवंत पाहायला आपण शिकायला हवं. हे व्रत केल्याने कोणाकोणाला फायदा झाला याच्या काही गोष्टी पुढच्या अध्यायामध्ये येतात एखादी वस्तू आपल्याकडे नसेल तर त्यासाठी काय करावे याचा पर्याय शोधण्याचे स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला दिल आहे. जसं आपल्या देहाला तसं देवाला या न्यायाने उत्तम प्रकारचे साहित्य वापरण्याची सूचना या कथेमध्ये आपल्याला दिसते म्हणजे दुसऱ्याला देताना चांगलं द्यावं हा संस्कार घडतो.
या कथेमध्ये अजून एक विचार दिसतो तो असा की, जे जे आपणासी ठावे ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकलजन या समर्थांच्या वचनाप्रमाणे ज्या गोष्टीमुळे आपलं कल्याण झालं ती गोष्ट इतरांना सुद्धा सांगावी. आपल्या पुरती मर्यादित ठेवू नये; हा विचार दिसतो. आपल्याला झालेल्या ज्ञान हे इतरांपर्यंत पोहोचवावं म्हणजेच ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करावा हा महान विचार या कथेतून आपण घ्यायचा आहे.
कथेमध्ये पुढे कलावतीची गोष्ट येते 21 व्या शतकामध्ये 2026 सालामध्ये जगताना आपण यातले कोणते गुण घ्यायचे तेवढा संक्षेपाने विचार करूया. कलावतीच्या वडिलांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली; की आपण सत्यनारायण व्रत करू, पण निर्णय घरी पत्नीला विचारून तिच्या सहमतीने किंवा एकमताने घेतला. संसार दोघांचा आहे संसार दोघांनी मिळून करायचा आहे पत्नीने होकार दिल्यावर त्यांनी नवस केला. नवसाची परंपरा मोठी आहे. आपल्याकडे नवस याचा अर्थ म्हणजेच देवाला शब्द देणे म्हणजेच कमिटमेंट देणे असा होतो.
आपणही व्यवसाय नोकरी करताना कमिटमेंट देतो काम पूर्ण करणे, ऑर्डर पूर्ण करणे यासाठी आश्वासन देतो मग ते पाळणं आपल्याला बंधनकारक आहे. नवस फेडला नाही म्हणून देव रागावला आणि पुढे काही गोष्टी घडल्या देवाला शरण गेल्यावर मग त्याने रक्षण केलं. याचाच अर्थ आपण दिलेल्या शब्द जर पाळला नाही तर व्यवहारांमध्ये सुद्धा आपला ग्राहक आपल्यावर आगपाखड करणारच आहे. स्वप्नात दिलेला शब्द सुद्धा पाळण्याचा आपला इतिहास आहे. जर आपल्याला शक्य नसेल तर ती कमेंट देऊ नका किंवा कालावधी आधीच वाढवून घ्या; नाहीतर ठरलेल्या वेळेत ती पूर्ण करा, हाच विचार आपण या कथेतून घ्यायचा आहे. सध्याच्या स्पर्धेच्या जगामध्ये आपल्याला अनेक पातळीवर लढाई करावी लागते मानसिक तणाव, आर्थिक चणचण, नातेसंबंध दुरावा अशी विविध संकट समोर येतात श्री सत्यनारायण व्रताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा श्रीकृष्णाचे गुण आपल्यात अंगीकारणे आणि रोजच्या जीवनात ते गुण कसे उतरवता येतील याचा विचार करण्याचा असायला हवा.
भगवान श्रीकृष्ण मित्र म्हणून भाऊ म्हणून पुत्र,पती,गुरु, शिष्य, राजकारणी, योद्धा, मार्गदर्शक म्हणून कसा वागला याचा आपण विचार करायला हवा. धर्मसंस्थापक, धर्म संरक्षक – राष्ट्रसंरक्षक म्हणून श्रीकृष्णाचं कार्य हे आपल्यासाठी निश्चित मार्गदर्शक आहे.
श्रीकृष्णाच्या या विविध भूमिकांचा अभ्यास विचारपूर्वक आपण केला आणि अंगीकार केला तर श्रीसत्यनारायण आपल्यावर कृपा करेल.
श्रीसत्यनारायण पूजा करताना माझ्या सर्व सकल हिंदू परिवाराचं कल्याण करावं, सर्व हिंदू समाजाला सुख-समृद्धी, निरोगी आयुष्य प्रदान करावे, ऐक्याची भावना दृढ करावी, तन-मन धनपूर्वक धर्मकार्य करण्याची बुद्धी सर्वांना द्यावी, ही सत्यनारायण चरणी प्रार्थना.
वेदसेवक किरण प्रकाश पेंडसे गुरुजी
दापोली.
९७६५७३८७४८
Varun Athalye
अतिशय सुंदर माहिती.