गणेश दर्शन
आपला गणपती बाप्पा समजून घेण्याची आवश्यकता आहे. गणपतीची स्तोत्र म्हणताना मंत्राचा अर्थ समजत जातो. परंतु काही शब्द असे असतात, की त्यांचा अर्थ मुद्दाम पाहिल्याशिवाय कळत नाही आणि भावार्थ तर केवळ बुद्धिदात्या गणपतीच्या कृपेनेच ध्यानात येतो. बाप्पाची मूर्ती, चरित्र आणि तत्वज्ञान समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यतून आपल्या जीवनातली ज्ञान-कर्म-भक्ती समृद्ध होते.
अथर्ववेदातील गणपती अथर्वशीर्ष हे उपनिषद् आहे. उपनिषद् म्हणजे वेदांमधील परमात्मतत्त्वाच्या स्वरूपासंबंधीच्या ज्ञानधारणा ज्यात व्यक्त केल्या गेल्या आहेत असा भाग. गणपती अथर्वशीर्ष या उपनिषदात वेदांतील ज्ञानधारणा जणू एकत्रपणे परमात्म्याचे दर्शन घ्यायला आणि द्यायला आल्या आहेत.
या स्तोत्रात प्रधानतः गणपतीच्या परमात्मतत्त्व स्वरूपाचे ज्ञान सांगितले असले तरी मोठ्या भक्तिभावासहित त्याचे सगुणसाकार दर्शनही घडविले आहे. हे या उपनिषदाचे आगळेपण आहे.
या एका स्तोत्राचा अभ्यास केल्याने व त्याचा भावार्थ समजून घेतल्याने वेदांतील तत्त्वज्ञानाचा गाभा किंवा सार समजून घेतल्याचे श्रेय प्राप्त होईल. श्रीगणेशाच्या कृपेने या स्तोत्राचा जो अर्थ आणि भावार्थ आकलन झाला तो आपल्यापर्यंत पोहोचवावा असं प्रयत्न आहे. बुद्धिदाता गणपती या उपक्रमाद्वारे आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची प्रेरणा देऊन सर्वांवर कृपा करो.


