हिंदू धर्म – बालक युवक आणि पालक
हिंदू धर्म – बालक युवक आणि पालक
हजारो वर्षांपासून भारतीय समाज सामाजिक मूल्यांची जपणूक करतो. आपल्या ऋषीमुनींनी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना मांडली. सर्व पृथ्वी एक कुटुंब आहे संपूर्ण सजीव सृष्टी हा कुटुंबाचा भाग आहे, असं आपल्या मनात रुजवण्याचं कार्य केलं. आज जगातील अनेक राष्ट्र त्या राष्ट्रातील तरुण आबालवृद्ध मानसिक आरोग्यासाठी हिंदू कुटुंब पद्धतीचा अभ्यास करतात.
हिंदू संस्कृतीमध्ये आपण आदर्श बालकांचं उदाहरण बघायचं तर आपल्याकडे ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद, नचिकेत, अशी अनेक उदाहरणं पाहता येतील.
स्वामी विवेकानंदांचा प्रसिद्ध वाक्य – मला शंभर नचिकेत द्या मी जग बदलून दाखवेन यामध्ये स्वामीजींनी मागितलेला नचिकेत हा किशोरवयीन म्हणजेच बारा तेरा वर्षांचा टीन एजर आहे. कठोपनिषदामध्ये आलेली ही गोष्ट आपल्याला भारतीय शिक्षण किती समृद्ध संपन्न होतं हे दाखवते.
चुकीचं वागणार नाही आणि वागून देणार नाही त्याचप्रमाणे स्वतः आत्मपरीक्षण करणे निर्भयतेने वागणं आणि ज्ञानसंपन्न असणं अशा नचिकेतच दर्शन या गोष्टीतून घडतं म्हणून स्वामीजींना नचिकेत हवे आहेत. अशी स्वाभिमानी पराक्रमी बालक निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था आपल्याला पुन्हा एकदा निर्माण करावी लागेल.
युवकांमध्ये स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाच्या नावाखाली अनेकदा स्वैर वागणं होतं आणि नुकसानच पदरात पडत. युवकांमध्ये सामाजिक- कौटुंबिक गुन्हे, व्यसनाधीनता, तणाव, नैराश्य, आत्महत्या अशा समस्या पुढे येतात. हिंदू जीवन पद्धतीत कुटुंब व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत; ज्यांच्या आचरणामुळे आपण या सर्व समस्यांवरती मात करू शकतो; पण तसा दृष्टिकोन आपण ठेवणं आवश्यक आहे.
- संस्कार आणि परंपरा –
हिंदू संस्कृतीमध्ये विविध संस्कार हा एक जीवनशैलीचा भाग आहे जे कुटुंबाबरोबरच आपल्या समाजाची राष्ट्राची जबाबदारी घ्यायला सांगतात. - कर्तव्य प्रधानता –
हक्कांपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व आहे. - संयम आणि सहिष्णुता –
एकमेकांना समजून घेणे आणि नातेसंबंध टिकवणे यावर भर दिला आहे. - वडीलधाऱ्यांचा सन्मान –
वडीलधाऱ्यांचा आदर करणे ही हिंदू संस्कृतीची ओळख आहे. - धार्मिक अध्यात्मिक शिक्षण –
भगवद्गीता रामायण महाभारत यांसारख्या ग्रंथातून जीवनाचं व्यवस्थापन आणि नैतिकता शिकविली जाते. - सहकार्याची भावना-
एकमेकांना मदत करणं वेळ प्रसंगी धावून जाणं आणि कौटुंबिक विचार म्हणजेच राष्ट्राचा आणि समाजाचा विचार करताना सांघिक विचार करणं.
संस्कृतीच्या या वैशिष्ट्यांचा विचार करून युवकांमध्ये किंवा बालकांना याचा योग्य दृष्टिकोन देणे आवश्यक आहे. बालक आणि पालक यांच्या दृष्टीने विचार करताना सध्याच्या काळात आदर्श पालक घडविण्यासाठी काम करणं आवश्यक आहे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक साधुसंतांनी वेद पुराणांनी हेच शिकवलं आहे मात्र आपण त्यांच्याकडे पाठ फिरवल्यामुळे अधःपतन झालेले दिसते.
मुलांना चांगल्या वाईट याचा विवेक शिकवण, त्याबद्दल विचार करण्याचं सामर्थ्य देणं, आत्मविश्वास देण, निर्णयक्षमता देणं, हे आपलं काम आहे. देण्यापेक्षा सुद्धा ते त्यांना घेता यावं अशी परिस्थिती निर्माण करणे हे आपलं खरं काम आहे.
अशाच व्यवस्थेतून नचिकेत घडला कारण त्याचे वडील वाजश्रवस ऋषी हेच त्याचे गुरु होते, आदर्श पालक होते. ध्रुव बाळ घडला कारण त्याची आई सुनीती होती. तिच्या नावातच सगळं काही आहे.
भक्त प्रल्हादावर प्रत्यक्ष देवर्षी नारदांनी गर्भसंस्कार केले अशी उत्तुंग परंपरा आपल्या धर्माची आहे.
युवकांना आपल्या घरातील परंपरांचा रेती रिवाजांचा अभिमान वाटला पाहिजे. घरातले संवाद, संवादाचे शैली, भाषा, यातून घराची संस्कृती दिसते. तर घरासमोरची रांगोळी, तुळशी वृंदावन, उंबरठ्यावरच हळदीकुंकू, देवपूजा, मंत्र – जप, यातून भक्ती प्रतीत होते.
उत्तम संस्कार आचार विचार मनात असले आणि अंगी बाणले तर आताची पिढी निश्चितच धर्माभिमानी राष्ट्रभक्त बनेल, सत्सदविवेक बुद्धी हीच खरी शिदोरी आपल्याजवळ आहे.
सकल हिंदू समाज जागृत होत आहे आळस झटकून नवचैतन्य धारण करत आहे हे नक्कीच नव्या युगाची नांदी आहे. आपली पिढी आणि येणारी पिढी सशक्त व्हावी म्हणून आता मंदिरांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरामध्ये युवकांसाठी धर्मचर्चा, बालकांसाठी संस्कार वर्ग, आणि आदर्श पालक घडण्यासाठी सत्संग सुरू होतील याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी आवश्यक सर्व प्रशिक्षण आणि सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
आपली मंदिर ही फक्त सणांच्या दिवशी भक्ती पुरती मर्यादित न राहता, जर ती शक्तीचं केंद्र बनली तरच त्यातून आदर्श बालक आदर्श युवक आणि आदर्श बालक घडतील.
अभ्यासक किरण प्रकाश पेंडसे गुरुजी
दापोली



Leave a Reply